एक खटाटोप मधोत्पादन वाढवण्यासाठीचा :-
Image may contain: plant, outdoor and nature


पैसे कमावण्यासाठी निसर्गात नाक खुपसून ढवळाढवळ करण्याची मानवाची वृत्ती काही नवीन नाही.
पण असे खटाटोप मानवाच्याच कसे अंगलट येतात त्याची ही गोष्ट. ब्राझील देशाच्या सरकारचे एक जुने महात्वाकांक्षी स्वप्न होते. ब्राझीलला जगातील सर्वात जास्त मधोत्पादन करणारा देश बनवायचे. ब्राझील चे जनुकीय तज्ञ डॉ . वोर्र्वीक कर्र यांना आपण हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवू शकू असा विश्वास होता. मधमाश्यांच्या काही आफ्रिकन प्रजाती इतर प्रजातींपेक्षा खूप जास्त प्रमाणात मध निर्मिती करतात हे त्यांना माहित होते. त्यासाठी त्यांनी मध्य- दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया या देशात अभ्यास सफर काढली. आफ्रिकेतील अनेक मधमाश्यांचा अभ्यास करून त्यांनी सर्वात जास्त मध निर्माण करणारी एक प्रजात प्रयोगासाठी निवडली. ब्राझील सरकाने डॉ वोर्र्वीक यांना प्रयोगासाठी आफ्रिकेतून राणीमाश्या ब्राझील मध्ये आणायची परवानगी दिली मात्र त्या राणी माश्या पळून जाणार नाहीत याची जबाबदारीही त्यांच्या वर टाकली.

दरम्यान डॉ वोर्र्वीक यांना या आफ्रिकन प्रजाती बद्दल एक अजब गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे त्यांची अतिशय आक्रमक वृत्ती. तश्या कोणत्याही मधमाश्या त्यांच्या पोळ्याचा बचाव अतिशय आक्रमकपणे करतातच. मात्र या आफ्रिकन मध माश्या खूपच आक्रमक होत्या. अर्थात त्याला कारणही तसेच होते. ते म्हणजे आफ्रिकेत आढळणारा हनी ब्याजर नावाचा प्राणी. हा हनी ब्याजर मध माश्यांचा कट्टर शत्रू. मध माश्यांच्या डंखाना न जुमानता, तो त्यांची पोळी फोडून मध खातो. त्याच्या पासून आपल्या पोळ्याचा बचाव करण्यासाठी या मध माश्यांच्यात काही नैसर्गिक बदल घडून आले. पहिले म्हणजे वर सांगितलेली त्यांची अति आक्रमकता. प्रत्येक पोळ्याची स्वताची अशी एक संरक्षण रेखा असते. तिचे उलंघन केले की तुमच्यावर हल्ला झालाच समजा. या आफ्रिकन मध माश्यांची हे सीमा रेखा सामान्य मधमाश्यांच्या सीमा रेखेपेक्षा खूपच जास्त असते हा दुसरा फरक. तिसरा म्हणजे कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांचा होणारा प्रचंड हल्ला (सामान्य मध माश्या तुम्हास मुख्य हल्ल्या आधी आगाऊ इशारे देतात). चौथी म्हणजे एकदा डिवचले गेल्या वर चोवीस तासांहून अधिक वेळ त्यांचे संवेदनशील असणे. ( तुम्ही गुगल केलेत तर असे अनेक फरक तुम्हास समजतील). डॉ वोर्र्वीक यांना मात्र आपण काही प्रयोग करून या आफ्रिकन मधमाश्यांचा आक्रमक पणा कमी करू शकू असा विश्वास होता. त्यांनी प्रयोगासाठी ४७ आफ्रिकन राणी माश्या ब्राझील मध्ये आणल्या. त्यासाठी त्यांनी खास कृत्रीम पोळी बनवली. राणी माशी ही इतर कामकरी माश्यांपेक्षा मोठी असते. त्या कृत्रिम पोळ्याच्या जाळ्यांची रचना अशी केली होती की त्यातून फक्त कामकरी माश्या ये जा करू शकतील आणि राणी आतच राहील. या आफ्रिकन राणी माशांच्या सामान्य युरोपियन नरांशी मिलन घडवून अधिक मध उत्पादन करणारी; पण कमी आक्रमक असलेली प्रजाती निर्माण करण्याचा तो प्रयोग होता.
आफ्रिकेतून आणलेल्या एकूण ६३ राणी माश्यांपैकी १९५६ च्या शेवटी ४८ राण्या जिवंत राहिल्या होत्या. युरोपियन नरांशी संभोग करून अनेक संकरीत कामकरी माश्याही निर्मित झाल्या होत्या. ऑक्टोबर १९५७ पर्यंत सर्व सुरळीत चालू होते.आता एकूण २९ आफ्रिकी राणी माश्या जिवंत राहिल्या होत्या. या माश्या हाताळणाऱ्या सर्व कामगारांना राण्या पोळ्या बाहेर पडू न देणे किती महत्वाचे आहे याचे पूर्ण कल्पना होती. मात्र एका दिवशी एक नेहमीचा कामगार आला नाही आणि त्याच्या जागी बदली कामगार या राण्या हाताळत होता. आणि कदाचित हे अडसर चुकीने लावलेत अश्या समाजातून त्याने सर्व कृत्रिम पोळ्यातील राणी माश्यांना अडकवून ठेवणारे अडसर काढून टाकले आणि २९ पैकी २६ राण्या बंधन मुक्त झाल्या आणि त्यांच्या मागे त्यांच्या संकरीत कामगार माश्या /नर ही निसर्गात मुक्त झाले. जेव्हा डॉ. कर्र यांना ही घटना कळाली तेव्हा त्यांच्या हातात हताश होण्यापलीकडे काहीच नव्हते. मुक्त झालेल्या राण्यांनी ब्राझ्झील मधील अनुकूल वातावरणाचा पुरेपूर फायदा घेतला. आणि स्थानिक युरोपिअन नरांशी मिलन करून प्रजोत्पादन / वसाहती निर्माण सुरु केले. पुढील २-३ वर्षातच पाळीव प्राण्यांवर / शेतकऱ्यांवर मधमाश्यांच्या हल्ल्याच्या बातम्या येऊ लागल्या. लवकरच या माश्या Africanized honey bees (AHB) किंवा किलर बीज् म्हणून कुप्रसिद्ध झाल्या. या संकरीत माश्यांनी उत्तरेकडे वेगाने अधिग्रहण सुरु केले. स्थानिक युरोपिअन माश्यांची पोळीही काही दिवसात या Africanized honey bee वसाहतीत रुपांतरीत होऊ लागली.

निसर्ग चुकांना कधीच माफ करत नाही. आणि जरुरी नाही की जो चूक करतो त्यालाच ती भोगावी लागेल.
१९८६ … कोस्टा रिका … एक पर्वतारोही इन सी ऑई एका गुहेत उत्सुकतेपोटी शिरला आणि या माश्यांच्या हल्ल्यात मारला गेला.  त्याचा शरीरावर ८००० दंश सापडले ; जे एक माणूस मारण्यासाठी जेतके डंख लागतात त्याच्या ८ पट जास्त होते.  त्याच्या टोर्च च्या प्रकाशाने या माश्या खवळल्या असाव्यात.  १९९१ मध्ये जिजस डयाझ हे Brownsville , Texas मध्ये बाग काम करत होते . त्यांच्या गवत कापण्याच्या यंत्राच्या आवाजाने बाजूची माश्यांची वसाहत खवळली आणि त्यांच्या हल्यात ते जखमी झाले. त्यांच्या सुदैवाने त्यांनी आपल्या कपड्यांनी चेहरा झाकून पळ काढला आणि वाचले. नंतर त्या वसाहती ला नष्ट करून टाकले गेले. त्या माश्या आफ्रिकन आहेत हे नंतर प्रयोगशाळेत सिद्ध झाले. १५ जुलै ९३ रोजी ८२ वर्षीय लीनो लोपेझ हे या माश्यांचे अमेरिकेतील पहिले बळी ठरले. त्यांना ४० दंश केलेले आढळले.

या माश्या दिवसेंदिवस उत्तरेकडे पसरत आहेत, वसाहती वाढवत आहेत. उत्तरेच्या थंड वातावरणात या माश्या स्वतःस अनुकूल करून घेऊ शकणार नाहीत असा एक कयास होता. पण तोही फोल ठरत आहे.

तुमच्या माहितीकारता -
१. या माश्यांचे विष युरोपिअन माश्यांच्या विषापेक्षा जास्त तीव्र नाही . फरक हा आहे तो म्हणजे आफ्रिकन संकरीत माश्या या प्रचंड संख्येने हल्ला करतात. या माश्या युरोपिअन माश्यांपेक्षा जास्त लांब पाठलाग करतात. (जेव्हा मध माशी डंख मारते तेव्हा तिचा डंख तिच्या पोटापासून तुटून निघतो . माशी स्वत मरते पण तो डंख ज्यास डंख मारलाय त्या प्राण्याच्या शरीरात विष पंम्प करत राहातो . शिवाय तिचे पोट फाटल्या नंतर त्यांतून एक रसायन बाहेर पडते . त्याच्या वासाने वसाहतीतील माश्यांना वसाहतीवर हल्ला झाल्याची सूचना मिळते आणि जवळपास सर्व कामकरी माश्या शत्रूवर तुटून पडतात).
२. या माश्या नुसत्या डोळ्यांनी युरोपियन की आफ्रिकन अशा ओळखता येत नाहीत.
३. तुमच्या आसपास जर मधमाश्या आढळल्या तर स्थानिक अधीकृत बी कीपर लोकांना बोलवा , स्वत काढण्याचा प्रयत्न करू नका . हा डू इट युवरसेल्फ जॉब नाही .
४. समजा तुमच्या घरात मध माश्या आढळत असतील तर एकदा पाहणी करून घ्या .
५. तुमच्या वर जर माश्यांनी हल्ला केला तर माश्या चिरडत बसू नका. आपल्या कपड्यांनी चेहरा नाक, डोळे झाकून शक्य तेवढे जोरात दूर पळा. पाण्यात उडी मारू नका . माश्या तुम्ही बाहेर डोके काढायची वाट पाहतात.
६. निसर्ग सहलीला, ट्रेकिंगला जाताना काळजी घ्या. विशेष करून जेव्हा, अन्न शिजवण्यासाठी / शेकोटी पेटवताना आपण पोळ्याच्या खाली नाही आहोत याची खात्री करून घ्या.
७. बरेच दिवस बंद घरात प्रवेश करताना सावध असा.

मी कोणी कीटक तज्ञ नाही. या माहितीचा मुख्य स्त्रोत इंटरनेट आहे आणि जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. वेगवेगळी माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचावी हा या लेखाचा उद्धेश आहे. काही दुरुस्त्या / तृटी आढळल्यास जरूर सांगाव्या.

संदर्भ =


१. विकी
२. http://ag.arizona.edu/pubs/insects/ahb/inf15.html


३. https://www.youtube.com/watch?v=IQlIi61EUmo


४. https://www.youtube.com/watch?v=gstt3XlNXN4



५. प्रस्तुत फोटो इंटरनेट वरून घेतला आहे आणि प्रातिनिधिक आहे.

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (कौस्तुभ पोंक्षे ©) कॉपीराईट आहे.


कौस्तुभ पोंक्षे

Comments